Ration Card : आता तहसील कार्यालयाच्या चकरा होणार बंद, घरबसल्या ऑनलाईन करा शिधापत्रिकांमधील दुरुस्तीसह, नाव कमी करणे किंवा वाढवणे..

शिधापत्रिकांमधील दुरुस्ती, एखादे नाव कमी करणे, नवीन नाव समाविष्ट करणे या कामांसाठी नागरिकांना आपली कामे, मजुरी सोडून तहसील कार्यालयात यावे लागत होते.

वेळेत काम न झाल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात होता. मात्र आता शासनाने शिधापत्रिकाच्या सर्व सुविधांची कामे ऑनलाइन सेवेद्वारे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत विकसित शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीद्वारे (RCMS) ही कामे केली जाणार आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय थांबणार असून, तहसील कार्यालयातील चकरासुद्धा बंद होणार आहेत. डिजिटल इंडिया योजनेंतर्गत सर्व शासकीय कामकाज कागद विरहीत केली जाणार आहेत. (Ration Card Online Service Maharashtra)

शासकीय कामात पारदर्शकता यावी, वेळेचा अपव्यय न होता कामे जलदगतीने होण्यासाठी विविध संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याच उद्दिष्टाप्रमाणे अन्न पुरवठा व वितरण व्यवस्था पूर्णता संगणकीकृत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षाअंतर्गत येणाऱ्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच राज्य योजनेच्या दारिद्र्यरेषेवरील शेतकरी शिधापत्रिकाधारकांकरिता 16 मेच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत विकसित शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत क्यूआर कोड आधारित ई – शिधापत्रिका सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रणालीच्या पब्लिक लॉग इनद्वारे शिधापत्रिका अद्ययावत करणे, त्यात सुधारणा करणे, नाव कमी करणे किंवा नाव समाविष्ट करणे, स्थलांतरण करणे, समर्पण करणे, शिधापत्रिकेतील माहिती पाहणे, रास्त भाव दुकान पसंती आदी कामांकरिता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे .

तसेच ई – शिधापत्रिका डाउनलोड इत्यादी कामे घर बसल्या स्वतःच्या मोबाइल फोनवर किंवा जवळच्या संगणक केंद्रात जाऊन करता येणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा वाचणार असल्याची माहिती तालुका अन्न पुरवठा व वितरण निरीक्षण अधिकारी यांनी दिली.

प्रत्येक कामाकरिता तहसील कार्यालयाच्या चकरा मारणे व काम वेळेत झाले नाही तर होणारा मनस्ताप वाचणार आहे. शिधापत्रिकेच्या कामाकरिता www.mahafood.gov.in वर जाऊन ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली वर रजिस्टर करून कामे करता येणार आहे.

Spread Love:

Leave a Comment