Chandrayaan 3 : भारताचं चांद्रयान-3 हे काही दिवसांमध्येच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ देशाच्याच नाही, तर संपूर्ण जगाच्या नजरा या मोहिमेवर टिकून आहेत. जगातील बहुतांश देश हे चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत.
याचं प्रमुख कारण म्हणजे, चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचा फायदा हा केवळ भारतालाच नाही; तर जगातील कित्येक देशांना होणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे.
चांद्रयानाची उद्दिष्ट्ये
चांद्रयान 3 मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट हे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणं आहे. यानंतर चांद्रयान हे चंद्रावर विविध गोष्टींचं संशोधन करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाण्याचे अंश मिळतात का याची तपासणी चांद्रयान-3 करेल. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचे अंश दिसत असल्याचं स्पष्ट केलं होतं. याचीच आणखी तपासणी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून करेल.
सूर्यमालेच्या निर्मितीचं रहस्य
आपली सूर्यमाला ही सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली होती. यावेळी लघुग्रह, उल्काश्म हे सगळ्या ग्रहांवर आणि उपग्रहांवर आदळत होते. यातूनच आपल्या पृथ्वीवर जीवाची उत्पत्ती झाल्याचंही म्हटलं जातं. चंद्रावर वातावरण नसल्यामुळे यावेळी ज्या घडामोडी घडल्या होत्या, त्याचे पुरावे चंद्राच्या लपलेल्या भागात असण्याची शक्यता आहे. याचाही शोध चांद्रयान-3 च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
चंद्राचा लपलेला भाग
चांद्रयान-3 चंद्राच्या ज्या भागात उतरणार आहे, तो आतापर्यंत मानवापासून लपून राहिला आहे. त्यामुळे या भागातून भारताला जी माहिती मिळेल, ती संपूर्ण जगासाठी नवीन असणार आहे. (ISRO Moon Mission)
जगाला फायदा
व्हाईट हाऊसने असं म्हटलं आहे, की चांद्रयान-3 जो डेटा गोळा करेल, त्याचा फायदा या पुढील आर्टेमिस ह्यूमन लँडिंगसाठी होऊ शकतो. म्हणजेच, भविष्यात जेव्हा अमेरिका किंवा आर्टेमिस अकॉर्ड्समधील कोणताही देश चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा चांद्रयान-3 ने दिलेली माहिती त्यांच्या फायद्याची ठरू शकते.
भारताचा करार
यावर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आर्टेमिस करारांवर स्वाक्षरी केली. यानंतर आर्टेमिस अकॉर्ड्समध्ये सहभागी होणारा भारत 26 वा देश झाला. यासोबतच, भारताचा नासासोबत भविष्यातील संयुक्त मोहिमांसाठीही करार झाला आहे.
आर्टेमिस अकॉर्ड्स
अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने जगभरातील कित्येक देशांसोबत आर्टेमिस करार केला आहे. यानुसार, अंतराळ संशोधनाबाबत काही गाईडलाईन्स सेट करण्यात आल्या आहेत. भविष्यातील अंतराळ मोहिमा अधिक सुरक्षित करण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे. यानुसार, अंतराळात अडकलेल्या कोणत्याही देशाच्या अंतराळवीर किंवा उपग्रहांना मदत करण्यासाठी इतर देश प्रतिबद्ध आहेत. यासोबतच, अंतराळ मोहिमा पारदर्शक ठेवणे आणि मिळालेलं संशोधन शेअर करणे हेदेखील याचा भाग आहे.
यामुळेच भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यास त्याचा फायदा कित्येक देशांना होणार आहे. भविष्यात अंतराळ मोहिमा राबवण्याच्या आणि चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत असणाऱ्या देशांसाठी चांद्रयान-3 ने गोळा केलेली माहिती उपयोगी असणार आहे.