एजंटगिरीला लगाम! ऑनलाइन अर्ज करा, ३० दिवसांत मिळेल रेशनकार्ड; ‘ही’ कागदपत्रे जोडून करता येईल अर्ज

सोलापूर : रेशनकार्डसाठी एजंटांकडे पैसे व कागदपत्रे दिली, पण महिन्यानंतरही शिधापत्रिका मिळालीच नाही, अशा तक्रारींना आता कायमचा पूर्णविराम लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांना ऑनलाइन रेशनकार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बनावटगिरीलाही चाप बसला आहे.

आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाइन सुविधा केंद्रांवर जाऊन अर्ज करताना त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत. ५० ते १०० रुपयांच्या शुल्कात त्यासाठी अर्ज ऑनलाइन अपलोड केला जाईल. त्यानंतर अवघ्या ३० दिवसांत संबंधित व्यक्तीला रेशनकार्ड मिळणार आहे. त्यामध्ये दुबार किंवा विभक्त रेशनकार्ड, त्यातील नावे कमी करणे किंवा नावे वाढविणे, नवीन रेशनकार्ड काढण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी येईल. त्यानंतर त्या लाभार्थीला रेशनकार्ड मिळणार आहे. कोणत्याही एजंटांकडे जाऊन त्याला पैसे देण्याची गरज या सुविधेमुळे राहिलेली नाही. नागरिकांना आता शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या त्यांना शिधापत्रिका मिळणार आहे.

‘या’ संकेतस्थळावरुन करता येईल अर्ज

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता गावातील, शहरातील प्रत्येक नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिका मिळणार आहे. त्यासाठी त्यांना जवळील ऑनलाइन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन www.rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.


३० दिवसांत मिळेल रेशनकार्ड

शिधापत्रिका काढण्यासाठी आता कोणाकडेही जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन सुविधा केंद्रावरून अर्ज केल्यास ३० दिवसांत त्या व्यक्तीला नवीन रेशनकार्ड किंवा विभक्त रेशनकार्ड मिळणार आहे.

  • सुमीत शिंदे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर

मोबाईलवर येईल मराठीतून मेसेज

प्रत्येक शिधापत्रिका धारकाचा आधार क्रमांक आता लिंक करण्यात आला आहे. अंतोदय योजनेतील कुटुंबाला दरमहा ३५ किलो तर प्राधान्य कुटुंबाला प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते. केंद्र व राज्य सरकारने हे प्रमाण निश्चित केले आहे. दरम्यान, कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने त्याचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला लिंक केल्यास धान्य घेतल्यानंतर त्या व्यक्तीला काही वेळातच त्यासंबंधीचा मराठीतून मेसेज मोबाईलवर येणार आहे. त्यातून धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी कमी होतील, असा विश्वास विभागाला आहे.

अर्जासाठी ‘ही’ कागदपत्रे लागतात

  • उत्पन्न दाखला
  • रहिवासी दाखला (सातबारा उतारा, लाईट बिल)
  • आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे)
  • शेजारचे रेशनकार्ड झेरॉक्स स्वाक्षरी
  • १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन
Spread Love:

Leave a Comment